मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. लॉकडाऊननंतर आढावा घेऊन निर्णय घ्यायला हवा. मात्र, सरकार आत्ताच पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवावा लागेल, अशी भाषा करत आहेत. आरक्षण प्रश्नी मराठा समाज शांत बसणार नाही. त्यांना भाजप पाठिंबा देईल, मराठा समाज रस्त्यावर उतरेल म्हणून लॉकडाऊन वाढवला जात आहे. सरकारला मराठा आंदोलन पेलवणार नाही, झेपणार नाही, त्यामुळे ही खेळी केली जात आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं आणि ते उच्च न्यायलायात टिकलं सुद्धा. मात्र महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू न मांडल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले, असा दावा चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच या पुढे सर्व मराठा संघटनांना एकत्र घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचेही भाजपाने स्पष्ट केले आहे.
“कायदा अयोग्य असता तर नोकऱ्या, प्रवेश न्यायालयाने कसे दिले असते, राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात भाजपा पाठिंबा देणार असून एक तज्ज्ञ समिती नेमून तो कायदा कसा योग्य आहे, या गोष्टी दाखवून देऊ. तसेच सरकारला नवा मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल. मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल, त्याचा अहवाल केंद्राला पाठवावा लागेल” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
तर केंद्रात भाजपा ४०० जागांवर विजयी होईल-
चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचं टूल किट आणि राहुल गांधी हे करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, जर देशात लोकसभेच्या निवडणुका उद्या घेतल्या, तर मोदी 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवतील”