मुंबई - काही पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अपमान केला, असे म्हणत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. राज्यात अभूतपूर्व असा सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर कोणत्याच पक्षाला सत्तेसाठी दावा करता आला नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेच्या ३५६ या कलमाचा वापर करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा - 'काँग्रेस, राष्ट्रवादीचे अद्याप ठरलेले नाही, विचारधारेनुसारच पुढचा निर्णय'
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, की काही पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अपमान केल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. आम्ही सुध्दा राज्यपालांना वेळ वाढवून मागितली होती. परंतु, आम्हालाही वेळ वाढवून मिळाली नाही. राष्ट्रपती राजवट लागणे हा जनादेशाचा अपमान असून काही लोकांच्या हट्टामुळे ही परिस्थिती आहे. राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - आम्ही आघाडीसोबत जातोय, त्यासाठी भाजपनेच शुभेच्छा दिल्या - उद्धव ठाकरे
दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपने 'थांबा आणि पाहा'ची भूमिका घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.