मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाकरे सरकारने प्रार्दुभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून प्रसार रोखण्यासाठी आपत्कालीन कायद्यातंर्गत सरकारने 1 मे सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मजूर वर्गाला जाहीर केलेली आर्थिक मदत अद्याप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी महाविकासआघाडीवर टीका केली आहे.
मजूर, फेरीवाले, टॅक्सी - रिक्षाचालक यांच्यासाठी सरकारने एक आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याअगोदर भाजपाने केली होती. त्याप्रमाणे तशी घोषणाही महाविकास आघाडी सरकारने केली होती. त्या अनुषंगाने प्रत्येक लाभार्थ्याला 1500 रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, याबद्दल कोणतीही माहिती सरकारी वेबसाईट वर उपलब्ध नाही. त्यासंदर्भात भाजपाचे नेते संजय पांडे यांनी फोन लावून विचारपूस केली असता त्यांना ट्रान्सपोर्ट विभागातून माहिती मिळाली की, तिथे आम्हाला या ऑटो रिक्षा चालकांचे फॉर्म देखील अजून अपलोड झालेले नाहीत आणि अजून 30 ते 35 दिवसांचा कालावधी हे फॉर्म अपलोड करण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे या कष्टकरी रिक्षाचालकांना मदत कधी मिळणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजपाचे नेते संजय पांडे यांनी यासंदर्भात सरकारवर टीका करत माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न आहे की हे दोन महिने ही गरीब माणसे कशी जगणार? कोरोनामुळे हे लोक वाचतील पण उपासमारीमुळे हे वाचणार नाहीत हे निश्चितच आहे. येणाऱ्या पाच दिवसात हे फॉर्म या वेबसाईट वर अपलोड झाले नाहीत तर महाराष्ट्राला एका मोठ्या उद्रेकला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
हेही वाचा - सोलापुरात नगरसेविकेने उभारले ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटर