मुंबई - कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 1 कोटी 37 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे 'मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत; कोरोना पॅकेज द्यायला पैसे नाहीत, वा रे वा.. सरकार..!' अशा शब्दात भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवीन कार खरेदीचा अध्यादेश महाराष्ट्राचा जनतेला एकही रुपयांची मदत न करणार हे सरकार महाराष्ट्रातील मंत्र्यांसाठी नवीन गाड्या घेत आहे. करोडो रुपयांचा गाड्या घ्यायला सरकारकडे पैसे आहेत. मात्र, कोरोना संकटात योद्ध्याचे काम करणाऱ्या पोलीस तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात आहेत, ते पगार द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. मग हे मंत्र्यांचा गाड्या कसे घेत आहेत? असा सवाल कदम यांनी सरकारला केला आहे. तसेच कोरोनासाठी विशेष पॅकेज सरकारने जाहीर करावं, पोलीस व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्यांना द्यावेत, अशी मागणीही भाजपनेते राम कदम यांनी यावेळी केली.शुक्रवारी शासनाच्या अध्यादेशात नवीन कार खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये तीन महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशामध्ये राज्य सरकारचे उत्पन्न ही बंद झाले आहे. कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, स्थलांतरित मजुरांच्या जेवणाची सोय, क्वारंटाईन झालेल्या नागरिकांची सोय करणे, वैद्यकीय सामग्री खरेदी करणे, कोरोना चाचण्या करणार्या प्रयोगशाळा उभारणे अशा महत्त्वाच्या कामांमध्ये सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट झाला असल्याने सरकारी कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे वेतन देण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ ठाकरे सरकारवर आली आहे. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे व स्टाफ कर्मचार्यांच्या वापरासाठी एक अशा सहा गाड्या खरेदी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. इनोव्हा क्रिस्टा 2.4 झेडएक्स (7 एसटीआर) ही गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल 22 लाख 83 हजार रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. सहा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्याने तब्बल 1 कोटी 37 लाख रुपये गाडी खरेदीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. जनतेचे सेवक असल्याचा दावा करत सत्ता स्थापन करणार्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांवर केलेली उधळपट्टीबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे
त्यातच राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारचा या उधळपट्टीबद्दल सरकारला चिमटा काढत, आधी वेतन कापलेल्या कर्मचाऱ्यांना पैसे द्या, तसेच कोरोना पॅकेज जाहीर करा, मग मंत्र्यांचा गाड्यांची चिंता करावी, असे म्हटले आहे.