मुंबई : वर्षा बंगल्यावरील सेवकांना ताबडतोब घर खाली करा नोटीस मलबार हिल सेवा केंद्राने दिली आहे. कोरोना काळात कोणीही कोणाला बेघर करू नये, असे आवाहन करत असताना सरकार स्वतःच सेवकांना या संकटाच्या काळात बेघर करत आहे. हे कोणत्या माणुसकीला धरून आहे, ही नोटीस ताबडतोब मागे घ्यावी व अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी भाजप नेते राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत म्हटले आहे, गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून मुख्यमंत्री निवास वर्षा बंगला येथे सेवक काम करून राहतात. या कोरोना काळात त्यांना नोटीस बजावून गोरगरिबांना बेघर करण्याचे अमानवीय महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये कोणीही कुणाला बेघर करू नये, अडचणींच्या काळात भाडे मागू नये आणि कुणालाही नोकरीवरून काढू नये, अशा प्रकारचे मानवतावादी सल्ले महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला देण्यात आले होते. मात्र, वर्षा बंगल्यावर गेली अनेक वर्ष ४० - ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून राहणाऱ्या गरीब लोकांना मात्र सरकारकडून ताबडतोब संकटकाळात घर खाली करा, अशा नोटीस बजावल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारचे धोरण कोणत्या माणुसकीला धरून महाराष्ट्र सरकारने 'वर्षा' बंगल्यावरील या गोरगरिबांना बेघर करणारी नोटीस दिली आहे. ती त्वरित मागे घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर संकट काळात अशी नोटीस का बजावली. याची चौकशी देखील करावी अशी विनंती पत्र लिहत केली आहे. यावर ज्या विभागातून सेवकांना नोटीस आलेली आहे त्या कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले, शासकिय बंगला वर्षा येथील सेवक निवासस्थान येते राहतात. त्या ठिकाणचे तत्कालीन मंत्री यांनी बंगला हा १३ डिसेंबर २०१९ रोजी रिक्त केला होता, पंरतु त्यांनी केला नाही.
वारंवार सेवक निवासस्थान रिक्त करण्याबाबत तोंडी सूचना देऊनही अद्याप त्यांनी आपले सेवक निवासस्थान रिक्त केलेले नाही, म्हणून मंत्री यांचा सूचनेनुसार ते राहत असलेले घर रिक्त करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.