औरंगाबाद - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवसेनेने औरंगाबाद येथे १ हजार झाडं पाडण्याला परवानगी दिल्याची बातमी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केली होती. असं करणं पर्यावरणविरोधी आणि अक्षम्य असल्याचे मत अमृता फडणवीवस यांनी व्यक्त केले होते. या त्यांनी केलेल्या ट्वीटचे भाजपचे आमदार राम कदम यांनी समर्थन केले आहे.
मुंबईतील आरेच्या कारशेडसाठी लागणारी जागा मिळवण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाड तोडण्यात आली. आज त्या ठिकाणी पूर्ण मैदान असूनही या कारशेडला शिवसेनेने स्थगिती देऊन त्याचे काम थांबवले आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. हा शिवसेनेचा पूर्णपणे दुटप्पीपणा असून तो दाखवून देण्याचे काम अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटद्वारे केले असल्याने त्यात गैर काय, अशी भूमिका कदम यांनी घेलती आहे.
शिवसेनेने यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, ही झाडं काढून दुसरीकडे लावण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी अमृता फडणवीस यांचं जोरदार समर्थन केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व्हावं ही आमचीसुद्धा इच्छा आहे. किंबहुना मुंबईतील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता आणि महापौर बंगल्याची जागा शिवसेनेला मिळवून दिली होती. मात्र, त्यासाठी झाडे कापणे गैर असल्याने त्याचा निषेध करायलाच हवा, असे मत कदम यांनी व्यक्त केले.