मुंबई - शिवसेना नेते प्रताप सरनाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राईट हँड असे संबोधत सरनाईक हे फरार असल्याचा आरोप, भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ई़डी आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी ईडी आणि सीबीआयने लोणावळ्यामध्ये छापा टाकला आहे. या सगळ्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आता ईडी आणि सीबीआय प्रताप सरनाईकांचा शोध घेत आहे. प्रताप सरनाईक बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. ईडीने आणि सीबीआयने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर छापा टाकला आहे. काही वेळापूर्वीच दोन्ही तपास यंत्रणांचे अधिकारी या रिसॉर्टवर पोहोचले. यावरुन भाजप नेते किरीट सोमैया यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप नेते किरिट सोमैया यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. ईडीने सरनाईकांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरू केला आहे. याआधी गेल्या वर्षी ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतले होते.
हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड
किरिट सोमय्यांचे आरोप काय आहेत?
प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. तसेच ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. व्यापाराचे प्रमाणपत्र (OC) न घेताच त्यांनी सर्व फ्लॅटची विक्री केली असा आरोप किरीट सोमैया यांनी केला. 2008 साली ठाणे मनपाने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडण्याचे कारवाईचे आदेश दिले. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त जात असल्याचे सोमैया यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील किरीट सोमैया यांनी केली यापूर्वी केली होती.