मुंबई - 'उठता-बसता मुंबई आमची आहे असं बोलणाऱ्यांनी मुंबईला काय दिलं? असा सवाल करत भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
पावसामुळे वाहतूक खोळंबली -
पहिल्या पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाने शनिवारी सुद्धा हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने आठवड्यातून दुसऱ्यांदा लोकल वाहतूक ही खोळंबलेली होती. त्यामुळे मुंबईकरांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. मुंबईतल्या या परिस्थितीवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
हवामान विभागाचा अंदाज चुकवत दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर गुढघ्यापेक्षा जास्त पाणी साचत आहे. तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रुळांवर पाणी येत असल्याने लोकल रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम होत आहे. मुंबईत पहिल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी शिवसेनेवर टीका केली.
हेही वाचा - मराठा समाजाची दिशाभूल होऊ देणार नाही; १६ जूनपासून मूक आंदोलन - संभाजीराजे छत्रपती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते नागपूरचे आहेत. मात्र, मुंबईच्या विकासात या दोन्ही नेत्यांनी भरीव योगदान केले आहे. गडकरींनी मुंबईत 56 पूल बांधले. तर फडणवीसांनी मेट्रोचे जाळे विणले. याउलट मुंबई आमची असा उठता-बसता ध्यास करणाऱ्यांनी मुंबईला काय दिले? दरवर्षी पावसात तुंबणारी मुंबई, खड्डे,अनधिकृत बांधकाम व ते पाडल्याने जाणारे जीव, अशी टीका केशव उपाध्याय यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
गुडघ्यापर्यंत पाणी -
मुंबईत पावसाचे धुमशान सुरूच आहे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचलेले होते. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रहिवाशांची तारांबळ उडालेली होती. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पाणी पाणी पावसाचे पाणी भरले होते. त्यामुळे या संपूर्ण परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी असल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरत होते. कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून याठिकाणी आता मुंबई महानगरपालिकेने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.