मुंबई - रेमडेसिवीर पुरवठ्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडका फडकी बदली करण्यात आली आहे. इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत ही बदली करण्यात आली असल्याची चर्चा आत्ता सध्या रंगत आहे. अभिमन्यू काळे यांच्याकडे असलेली आयुक्तपदाची जबाबदारी आता परिमल सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे तर काळे यांच्या बदलीबाबत महाविकास आघाडी सरकार सुडाचे राजकारण करत आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत केली आहे.
या सगळ्या प्रकरणावरतून आत्ता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. अभिमन्यू काळे यांच्या बदलीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "रेमडेसिवीरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायचे नाही, असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे", असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
नेमके प्रकरण काय आहे..?
गेल्या दोन आठवड्यांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा हा महाराष्ट्रभर होत असताना याच इंजेक्शन वरतून सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे पूर्णपणे तापलेला आहे. रोज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या प्रकरणावरून उभे ठाकत आरोप करत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी काल भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आमच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पाठपुराव्या करता आलेले होते त्यांना एफडीए कमिशनर अभिमन्यू काळे यांनी त्यांना सहकार्यही केला आहे, असे वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी काल (दि. 21 एप्रिल) माध्यमांसमोर केले होते त्यानंतर एफडीएचे पत्र हे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देण्यात आले. या सगळ्या प्रकरणानंतर एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची तत्काळ बदली सरकारकडून करण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणामुळे सध्या राजकारणात चांगली चर्चा रंगत आहे.
हेही वाचा - चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून काढणाऱ्या मयुर शेळकेच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप