मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मानसिक अवस्थेबद्दल मीडियाला व पोलिसांना वेगवेगळी माहिती पुरवणाऱ्या सुसान वॉकर यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
कोण या सुसान वॉकर? त्यांनी कायद्याचे उल्लंघन करून सुशांतसिंह राजपूतची माहिती मीडियाकडे उघड का केली? पोलिसांची दिशाभूल का करत आहेत? त्यांचा बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे? त्यांचा जबाब कसा ग्राह्य धरणार? असे अनेक प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत. त्यांची पोलीस, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करून घेतली पाहिजे, असेही शेलार म्हणाले.
मुळात सुसान वॉकर या एक विदेशी महिला आहेत. मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्या भारतात व्यवसाय करतात. पण त्यांना भारतात व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे का? आणि नसेल तर त्या व्यवसाय कशा करू शकतात? या व्यवसायात त्या कोट्यवधी रुपये कमावतात. त्यासाठी महानगरपालिकेची व मुंबई पोलिसांची एनओसी त्यांनी घेतली आहे का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
सुसान वॉकर यांनी वृत्तवाहिन्यांना सुशांतच्या मानसिक अवस्थेची माहिती दिली होती. मेंटल अॅक्टनुसार अशी माहिती देता येत नाही. असे असतानाही त्यांनी कायद्याचा भंग केला. यासाठी त्यांना नक्कीच कोणाचे तरी पाठबळ आहे? या सगळ्याची चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.