मुंबई - महाविकास आघाडी सरकार बळाचा वापर करून भाजपा नेते किरीट सोमैयांचा आवाज दडपू पाहत आहे. पण ही दडपशाही चालणार नाही. भाजपा पूर्णपणे किरीट सोमैयांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज दडपता येणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
राज्यात लोकशाही संपली का?
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना कोल्हापूरला जाण्यास रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. महाविकास आघाडी सरकारने त्यांना रोखण्यासाठी पोलीस पथक पाठवले. त्यांच्यावर दबाव आणला. कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, रेल्वे स्थानकावरून परत पाठवू, कोल्हापूरच्या सर्किट हाऊसमध्ये स्थानबद्ध करू, असे इशारे किरीट सोमैयांना या सरकारने दिले. राज्यातील लोकशाही संपली का? असा सवाल करून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
हेही वाचा - किरीट सोमैयांना निवासस्थानी स्थानबद्ध, घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त तैनात
दंडुकेशाही चालणार नाही -
महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही चालणार नाही. या सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही आणि किरीट सोमैयासुद्धा घाबरत नाहीत. भाजपा सोमैयांच्या पाठीशी असून त्यांनी उघडकीस आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे तार्किक शेवटाकडे नेली जातील. महाविकास आघाडीने दडपल्याने हे विषय थांबणार नाहीत. मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून पकडले जाते. महाविकास आघाडीच्या राज्यात दहशतवादी मोकळेपणाने फिरतात आणि सोमैयांच्या घराबाहेर मात्र दीडशे पोलिसांचा वेढा घातला जातो. याचा निषेध करत असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.