मुंबई - हिमाचल प्रदेश विधानसभा व पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर दादर येथील टिळक भवन या पक्ष कार्यालयात ढोल, तोशे, फटक्यांच्या आतिषबाजीसह मिठाई वाटून विजय साजरा करण्यात आला. दरम्यान, आजचे निकाल देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे आहेत. भारतीय जनता पक्षाने ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगासह सर्व यंत्रणांचा वारेमाप गैरवापर केला. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली, मुंद्रा पोर्टावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले, तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपाचे द्वेषाचे राजकारण - याचवेळी गुजरात निकालांचे आत्मपरीक्षण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना गुजरातमध्ये महिनाभर तळ ठोकून बसावे लागले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशातही भाजपाचा काँग्रेसने पराभव केला आहे. देशातील जनतेने काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जून खर्गेजी, सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्ष व काही लोकांनी मोदी नावाचा बागुलबुवा उभा केला असून देशात कोणतीही लाट नसून लाट आहे ती जनतेची आणि देशातील जनता भाजपाचे द्वेषाचे राजकारण, ढासळती अर्थव्यवस्था, महागाई व बेरोजगारीला कंटाळली असून त्याचेच प्रतिबिंब या निकालात दिसून आले आहे असही पटोले म्हणाले आहेत. विरोधी पक्षांवर जनतेने विश्वास व्यक्त केला असून देशात आता परिवर्तन होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
काँग्रेसचीच सत्ता - गुजरातमध्ये आपचा काही प्रमाणात कॉँग्रेसला फटका बसला असल्याची चर्चा असतांना नाना पटोले यांनी मात्र त्यावर बोलणे टाळले आहे. केंद्रात असलेली सत्ता आणि तपास यंत्रणेच्या जोरावर भाजप गैरवापर करून सत्ता मिळवायची असे भाजपचे धोरण असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कोणीही भाजपचे नेते गेले तरी काहीही फरक पडणार नाही, तिथे काँग्रेसचीच सत्ता येईल असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी मोदींचा करिश्मा तिथे कायम असल्याचे दिसून येत आहे, याशिवाय कॉँग्रेसची निवडणूक येणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.