मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेचा बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प फसवा आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या आजी आणि माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत या अर्थसंकल्पाबाबत टीका केली आहे.
आकड्यांची फिरवाफिरव करणारा अर्थसंकल्प
आज मुंबई महानगरपालिकेचा बजेट सादर झाला. पालिकेच्या आयुक्तांनी जी अर्थसंकल्प सादर केला तो फसवा आहे. विकासाची स्वप्ने दाखवणारा अर्थसंकल्प असून विकासासाठी पैसे कोठून आणणार याची माहिती दिलेली नाही. पालिकेचे उत्पन्न घटले आहे. सरकारकडे जवळपास 5 हजार कोटी थकबाकी आहे. ती कशी मिळवायची हे या अर्थसंकल्पात सांगीतलेले नाही किंवा याबाबत स्थायी समितीने काही उपाय योजना केल्या नाहीत. हा अर्थसंकल्प आकड्यांची फिरवाफिरव करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजप गटनेता प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
वेळ आल्यास निदर्शने करणार
या अर्थसंकल्पात खोटी स्वप्नेही मुंबईकरांना दाखवण्यात आली आहे. कारण, विकासासाठीच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, त्यासाठी पैसे कोठून आणणार हे स्पष्ट केलेले नाही. वेळ आली तर निदर्शने करणार आहोत, असे आमदार पराग आळवणी यांनी सांगितले.
मुंबईचा नाही तर वरळीचा अर्थसंकल्प वाटतोय
मुंबईचा अर्थसंकल्प कमी आणि वरळीचा अर्थसंकल्प जास्त दिसत आहे. कोरोनाच्या काळातही आपला फायदा शिवसेना बघत आहे. मुंबई शहराला काय दिले ते एकदा आम्हाला सांगावे, असे माजी भाजप गटनेते राजहंस सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर; मुंबईकरांवर कोणताही कराचा बोजा नाही