मुंबई- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विधानसभेत विरोधी पक्ष भाजपने सावरकर गौरव प्रस्तावाची मागणी करून एकीकडे गोंधळ घातला होता. मात्र, आता भाजपनेच सावरकरांचा अपमान केल्याचे वक्तव्य शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, की महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नाही तर दोन वेळा सावरकर यांना भारतरत्न खिताब देऊन सन्मानित करण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. दोन्ही वेळेला बहुमत असताना या विनंतीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले. हा सावरकरांचा अपमान असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. बहुमताच्या जोरावर केंद्र सरकराने अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेतले आहेत. लोकांवर अन्याय करणारा नोटबंदीचा निर्णयही भाजप सरकारने घेतला होता. मग केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय का घेतला नाही, असा परखड सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी
राज्यातल्या विविध प्रश्नांवर भाजपने आयोजित केलेल्या एल्गार मोर्चात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने बांगड्या घातल्या आहेत का ? असे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य महिलांचा अपमान करणारे असून याबाबत फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. आजच्या काळात महिला सक्षम झाल्या आहेत. आर्थिक बाजू सांभाळताना काम करत त्या आपल्या परिवाराचे पालन करत आहेत. महिला आता कमजोर राहिल्या नाहीत. बांगड्या घातल्या आहेत का, असा उल्लेख करून फडणवीस यांनी तमाम महिला वर्गाचा अपमान केला असून त्यांनी जनतेची माफी मागावी, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
महिला अत्याचाराच्या मुद्यावर भाजपने काल सभागृहाचे काम बंद पाडले. विधान सभेत आज महिला अत्याचारावर लक्षवेधी चर्चा होत असताना भाजपने चर्चेत गोंधळ घातला. हे कशाचे प्रतिक आहे, असा सवाल करत भाजपने केवळ खेळ मांडल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा- 'महिला अत्याचार प्रकरणात त्वरित न्यायासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापणार'