मुंबई - सिनेकलावंत सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास आलेल्या बिहार पोलीस दलातील अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिवारी यांच्या तपासात अनेकांची नावे समोर येऊ शकतील म्हणून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या केसचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी पालिकेने तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करावे, या मागणीसाठी आज भाजपने गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासासाठी बिहार पोलीस मुंबईत आले आहेत. काल आयपीएस अधिकारी असलेले विनय तिवारी हे मुंबईत आले असता त्यांना पालिकेने क्वारंटाईन केले आहे. याचा जाब विचारण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी पालिका आयुक्त कार्यालयात नसल्याने तसेच भाजपचे निवेदन घेण्यास कोणताही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने पालिका आयुक्त कार्यालयाच्या बाहेर नगरसेवकांनी निवेदन चिकटवून निषेध केला.