मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर आता शिवसेनाही सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरली आहे. मात्र, सेनेने सत्ता स्थापनेचा दावा कायम ठेवला आहे. अशातच आता भाजपची वेट अॅन्ड वॉचची भूमिका असल्याचे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. राज्यातील सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.
रविवारी भाजपने राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. शिवसेनेने जनमताचा आदर केला नसल्याचा आरोपही भाजपने केला होता. शिवसेना आमच्याबरोबर येण्यास उत्सुक नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करु शकत नसल्याचे भाजपने स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेला पाठिंबा न दिल्याने शिवसेनाही सत्ता स्थापन करु शकली नाही. आता तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी २४ तासांचा अवधी दिला आहे.
विधानसभा निवडणुकींचा निकाला लागून १८ दिवस उलटून गेले तरी अद्यापही सत्ता स्थापनेचा पेच सुटला नाही. भाजप शिवसेना सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले असल्याची स्थिती सध्या तरी पाहायला मिळते आहे. अशातच भाजपने मात्र, वेट अॅन्ड वॉचची भूमिका ठेवली आहे.