मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा संदेश घराघरात पोहचवला. मात्र, त्यांच्याच पक्षातून ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व) मतदार संघातून निवडणूक लढवणारे मनोज कोटक यांच्या बाईक रॅलीदरम्यान कचऱ्याचे ढीग रस्त्यावर टाकण्यात आले. त्यामुळे हेच का स्वच्छ भारत अभियान? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रविवारी सायंकाळी कोटक यांच्या समर्थनार्थ घाटकोपर पंत नगर येथील बस डेपो पासून मुलुंड पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीमध्ये खासदार किरीट सोमय्या आणि उमेदवार मनोज कोटक सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात करताना बाईकवर भाजपा, शिवसेना, रिपाईचे झेंडे लावण्यात येत होते. रॅली सुरू झाल्यावर रॅली मुलुंडच्या दिशेने निघाली. त्यानंतरही राजकीय पक्षांचे झेंडे आणि कोटक यांचे पोस्टर रस्त्यावर टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर खाऊचे बॉक्स देखील रस्त्यावर टाकण्यात आले होते. यामुळे घाटकोपर डेपो बाहेरील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत होते.