मुंबई - लिंगायत समाजाच्या मतांची बेरीज जुळविण्यासाठी गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना सोलापूर लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काँग्रेसने यापूर्वीच सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरही सोलापूरमधून लढण्याची शक्यता आहे. शिवाचार्य महाराजांच्या जातीचे प्रमाणपत्र, प्रचाराची रणनीती, महाराज मंडळींचे सहकार्य यासंबंधाने भाजपने आधी चाचपणी केली. शिवाय शिवाचार्य महाराजांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पुढाकारही घेतला. तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महास्वामींबरोबर यासंदर्भात चर्चा केली.
डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महारांजांचे मन वळवण्यासाठी मैंदर्गीचे श्री. ष. ब्र. नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, नागणसूरचे मठाधिपती श्री. ष. ब्र. रेणुक शिवाचार्य आदींनीही पुढाकार घेतल्याची माहिती आहे. सोलापूर लोकसभा लढण्यासंबंधीची बैठक, जिल्हा व सीमावर्ती भागातील महास्वामींशी झालेली चर्चा, मुंबईच्या मुख्यमंत्री कार्यालयातून हलविण्यात आलेली सुत्रे तसेच मुंबई येथे भाजप नेत्यांबरोबर झालेला कार्यक्रम आणि सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला लावलेली उपस्थिती यावरुन गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.