मुंबई - महापौर प्रतिनिधित्व करत असलेल्या महालक्ष्मी धोबीघाट येथील एका सार्वजनिक शौचालयावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत.या सार्वजनिक शौचालयावरून महापौर विरुद्ध मनसे, भाजपा असा सामना रंगला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे व भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केला आहे. महापौरांनी पदाचा गैरवापर करत एका शिवसैनिकाला शौचालय चालवण्यासाठी दिल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. तर, आशिष शेलार यांनीही नागरिकांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र, पण कोणत्याही नियमांचा भंग केला नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महापौरांनी पदाचा गैरवापर केला - मनसेचा आरोप
महालक्ष्मी येथील प्रसिद्ध धोबीघाट येथे 1994 पासून कार्यरत असलेल्या धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालय चालवण्यात येत होते. त्याचे नूतनीकरण करण्याच्या निमित्ताने शौचालय व्यवस्थापनामध्ये कसलीही तक्रार नसतानासुद्धा संस्थेकडून ते काढून घेण्यात आले. स्थानिक नगरसेविका आणि मुंबईच्या महापौर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बृहन्मुम्बई महानगरपालिकेच्या संगनमताने प्रभाग क्र.199 च्या शिवसेना गटप्रमुख यांना हे शौचालय चालविण्यास दिले आहे. या शौचालयाचे व्यवस्थापन धोबी कल्याण संस्थेमार्फत केले जात होते परंतु महापौरांनी हस्तक्षेप करून शिवसेनेच्या गटप्रमुखास चालवण्यास दिले आहे. याला सर्व नागरिकांचा विरोध आहे. या नागरिकांना मनसेकडून पाठिंबा देण्यात आला असून सत्ताधारी नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार करत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केली.
भाजपाचा या आंदोलनाला पाठिंबा - अॅड. आशिष शेलार
धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नुतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. ही संस्था अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देत असताना महपौरांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम देण्यासाठी घाट घाटला आहे. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज (दि.१४ जून) याबाबत भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी धोबी घाटात जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिकांनी आपले म्हणणे मांडले. ज्या संस्थेला शौचालयाचे काम देण्यात आले आहे ती संस्था दर वाढविणार आहे. तसेच शौचालयाचे काम पुर्ण झाले. पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सदर शौचालयाचा लोकार्पण कार्यक्रम झाला पण शौचालय खुले केले नाही. दर काय असतील हे सांगितले जात नाही. त्यामुळे स्थानिक आंदोलन करणार स्थानिकांनी शेलार यांना सांगितले. याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी आपण चर्चा केली असून पुन्हा याबाबत चर्चा करु. स्थानिकांची संस्था हे शौचालय चालवण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत असून त्यांच्याकडून अचानक काम काढून घेणे अन्याय कारक आहे. ते काम काढून घेतले? ते कधी सुरू होणार? दर किती असणार? महापौरांनी या सगळ्याची उत्तरे देणे आवश्यक आहे. स्थानिकांचा विरोध असून त्या विरोधात ते जन आंदोलन करणार आहेत. भाजपाचा या आंदोलनाला पाठींबा असेल, असेही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.
कोणावरही अन्याय केलेला नाही - महापौर
धोबी घाटातील सार्वजनिक शौचालयावरून राजकीय वाद पेटला आहे. त्याठिकाणी सर्व धोबी राहतात. ते सर्वच माझे मतदार आहेत. मी कोणावरही अन्याय केलेला नाही. हे शौचालय चालवण्यास देताना सर्व संस्थांना कागदपत्रे देण्याचे आवाहन पालिकेने केले होते. पालिकेच्या नियमाप्रमाणे ते देण्यात आले आहे. त्याठिकाणी राहणारे काही शिवसैनिक आहे तर काही शिवसैनिक नाहीत म्हणून आरोप केले जात आहेत. काही लोकांचे मनसुबे वेगळे असले तर मला माहित नाही असे महापौरांनी म्हटले आहे. संदीप देशपांडे ते असेच बोलणार पण आशिष शेलार हे एक आमदार आहेत. भाजपचे एक महत्वाचे नेते आहेत त्यांनी तरी यावर राजकारण करू नये असे महापौरांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Adani Lost 55k Cr, अदानींचे एका दिवसात 55 हजार कोटींचे नुकसान, असा बसला फटका