मुंबई : 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुका या विरोधकांसाठी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या या भारतीय जनता पक्षासाठी आहेत. महाराष्ट्र हे या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे राज्य राहणार आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागा या देशाचे भवितव्य घडवू शकतात, अशा पद्धतीचे वातावरण सध्या आहे. महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार देण्याची तयारी आघाडीने केली आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीने देखील एकाच उमेदवाराला प्राधान्य देण्याची योजना आखली आहे.
पोटनिवडणुका ही रंगीत तालीमच : आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्या अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झाल्या. महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी तीन ते चार उमेदवार प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाचे होते असेच आतापर्यंतचे चित्र आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभाच्या दोन पोट निवडणुकांमध्ये मात्र, वेगळे चित्र दिसले. पुण्यातल्या कसबा मतदारसंघमध्ये महाविकास आघाडीतर्फे दिलेल्या उमेदवाराने भारतीय जनता पक्षाच्या दणकट उमेदवाराचा पराभव केला. लगतच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतर्फे एक उमेदवार आणि शिवसेनेचा बंडखोर उमेदवार असे दोन उमेदवार उभे राहिल्याने तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाला.
BRS चा माहाविकास आघाडीला फटका : 2024 च्या निवडणुकांचा विचार करायला गेले तर, महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष काय करणार? त्याचप्रमाणे डाव्या विचारांची आघाडीचे काय होणार हे अद्याप स्पष्ट नाही. या दोन्ही आघाड्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेली नाही. शेकाप आणि माकप या पक्षांची भूमिका काय राहील. त्याचबरोबर भारत राष्ट्र समिती या पक्षाचा या निवडणुकीमध्ये होत असलेला शिरकाव हासुद्धा एक मोठा फॅक्टर राहणार आहे, असे मत जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले. बी.आर. एसमध्ये महाविकास आघाडीतील दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीतील नेते मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्याचा मोठा फटका ही महाविकास आघाडीच्या विवरचनेला बसू शकतो असेही जोशी म्हणाले.
मतदारसंघात एकच उमेदवार : यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड सांगतात की, लोकसभा निवडणुकींना साधारणपणे दहा महिन्यांचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत सर्वच प्रमुख राजकीय पक्ष मग ते महाविकास आघाडी असेल, शिंदे फडणवीस आघाडी म्हणजेच एनडीए असेल या सगळ्यांनी आता लोकसभेच्या दृष्टीने तयारी करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार द्यायचा असे नियोजन सुरु आहे. म्हणजे जिथे शिवसेनेचा उमेदवार प्रभावी असेल किंवा आता ज्याचा खासदार असेल त्याच्याकडेच ती जागा द्यायची असा निर्णय जागा वाटपासाठी घेण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यानंतर त्यांना विजय प्राप्त करता आला असे, गायकवाड यांनी सांगितले.
बंडखोरीचा मोठ्या प्रमाणात धोका : प्रत्येक निवडणुकीमध्ये बंडखोरीची लागण होत असते. निवडणुकीमध्ये बंडखोरीची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. कारण दोन्ही बाजूने अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस यांचा विचार केला असता एकत्र लढले तर या दोन्ही आघाड्यांना बंडखोरी थोपवता येणे शक्य होणार नाही. सत्तेसाठी अनेक जण इच्छुक असतात. त्यामुळे हा त्रास त्यांना संभावणारच असेही, गायकवाड म्हणाले. एवढ्यावरच हे थांबणार नाही तर, भारतीय राष्ट्र समिती आणि आप या दोन पक्षांचा विचार करावाच लागेल. या दोन पक्षांचा आतापर्यंतचा प्रवास जर, पाहिला तर तो प्रभावशाली आहे. त्यामुळे या दोन पक्षांमुळे महायुती आणि महाआघाडी यांच्यामुळे आगामी निवडणुका रंजक होणार आहेत असे गायकवाड म्हणाले.