मुंबई - देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यातच शनिवारी दादरमध्ये भाजप प्रणित संविधान बचाव मंचच्यावतीने या कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर आगडोंब उसळलेला असतानाच आता या कायद्याच्या समर्थनार्थ देखील नारे लागू लागले आहेत. मुंबईतील दादरच्या सुविधा दुकानासमोरील चौकात शनिवारी भाजप प्रणित संविधान बचाव मंचच्या वतीने या कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्याशिवाय काम करून घरी परतत असलेल्या काही मुंबईकरांनी या आंदोलनकर्त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी उपस्थित वक्त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आल्याने भारताबाहेरील अन्यायग्रस्त बांधवांना हक्काचे घर मिळेल. तर, ज्यांना आपली संख्या कमी होईल अशी भीती आहे, त्यांनाही चोख उत्तर मिळेल, अशी भूमिका मांडली.
याशिवाय एनआरसी या कायद्याविरोधात देशातील मुस्लीम समाज रस्त्यावर उतरलेला असला तरीही या कायद्याने कुणाचेही नुकसान होणार नसून त्याला नाहक विरोध होत आहे. मात्र, १९७५ पूर्वीची कागदपत्र देखील ज्यांच्याकडे नाही त्यांनाच या कायद्याच्या अंमलबजावणीची भीती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा - नवीन वर्षात सुरू होणार शालेय विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी
'ले के रहेंगे आझादी', 'वी वॉन्ट एनआरसी' अशा अनेक घोषणांनी दादरचा परिसर निनादून गेला होता. या कायद्याविरोधात एवढी लोक एकत्र येत असताना त्याच्या समर्थनार्थ प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर २०० लोक जरी जमली तरीही फार मोठे जनआंदोलन उभे राहू शकेल अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. हा कायदा उद्याच्या सुरक्षित भारतासाठी गरजेचा असून त्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी, अशी भूमिका मांडून या चौकात निदर्शनाची सांगता करण्यात आली.
हेही वाचा - पाहा कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय शेतकरी नेत्यांना?