मुंबई - पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. राज्यभरात राफेलसंदर्भात राहुल गांधींनी देशाची जाहीर मागावी या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन केले जात आहे.
राज्यभरात राहुल गांधींविरोधात आंदोलन -
जळगाव : भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. तसेच राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
हिंगोली : राफेलसंदर्भात राहुल गांधींनी भाजप सरकारवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली. तसेच यावेळी राहुल गांधींनी देशाची जाहीर माफी मागावी यासाठी आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे : राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने जनतेचा अपमान झाल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला. यावेळी राहुल गांधींच्या विरोधात निर्दशने करण्यात आली. तसेच राहुल यांनी जनतेची आणि मोदींची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी दिला. यावेळी भाजपचे नगरसेवक, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
धुळे : राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी भाजपची आणि मोदींची माफी मागावी, अशी मागणी धुळे भाजपच्यावतीने करण्यात आली. तसेच राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जालना : भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून राहुल गांधींचा निषेध करण्यात आला. त्यामध्ये राफेलसंदर्भात राहुल गांधींनी भाजपवर आरोप केल्यामुळे जनतेची दिशाभूल झाली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सांगली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सांगली भाजपकडून आंदोलन करण्यात आले. राफेल विमान खरेदीप्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. सांगली महापालिकेच्या महापौर संगीत खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नागपूर : भाजपच्यावतीने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
पुणे : राहुल गांधी यांनी राफेलसंदर्भात आरोप करून देशवासीयांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेचा माफी मागावी, अशी मागणी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. आज त्यासाठी शनिपार चौक येथे कसबा मतदारसंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
वर्धा : शहरातील शिवाजी चौकात भाजपच्यावतीने राहुल गांधींच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधींना जनेतसमोर माफी मागायला भाग पडू, असे वक्तव्य खासदार रामदास तडस यांनी केले. तसेच राहुल गांधी चोर हैं, अशा घोषणा देण्यात आल्या.
रत्नागिरी : राफेल संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने राहुल गांधी यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने याबद्दल जनतेची माफी मागावी, अशी मागणी करत रत्नागिरी जिल्हा भाजपकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सातारा : राफेलसंदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारवर चुकीचे आरोप केले होते. त्यामुळे त्यांना जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच 'चौकीदार नही, राहुल गांधी चोर है' अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
गडचिरोली : राफेल प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी यासाठी भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच यावेळी राहुल गांधी माफी मांगो, अशा घोषणा देण्यात आल्या.