मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने राज्यातही प्रवेश केला आहे. मुंबई आमि मुंबई परिसरात कोरोनाचे 9 रुग्ण सापडले. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या सर्व कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी 31 मार्चपर्यंत तात्पुरती बंद केली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात येत असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
चीनच्या हुवांग प्रांतातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हजारो नागरिकांचे बळी घेतले आहेत. राज्यात आतापर्यंत या विषाणूच्या प्रभावाखाली 31 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबई आणि मुंबई परिसरात 9 रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कोरोनाबाबतच्या चाचण्या आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जात आहेत. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - बॉक्स ऑफिसला कोरोनाचा फटका, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह राहणार बंद
या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या mohfw.gov.in या संकेतस्थळावरील Novel Corona virus (COVID-19) च्या अनुषंगाने प्रसारित केलेल्या सल्यानुसार बायोमेट्रिक प्रणाली मधून हजेरी नोंदवण्यासाठी सूट देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आपल्या कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी 31 मार्च पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद केली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.