मुंबई - कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाचा धोका वाढता असून, येथील अनेक भाग कंन्टेटमेंट झोनमध्ये येतात. असे असताना दुसरीकडे मात्र, याच परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीए) कडून भिवंडी-कल्याण शीळ रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. त्यानुसार 21 किमीच्या या रस्त्यातील पडले गाव ते शिळफाटा या जवळपास साडे तीन किलोमीटर लांबीच्या चारही मार्गिकेचे काम येत्या 15 दिवसातच पूर्ण होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.
कल्याणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने 21 किमीच्या सहापदरी भिवंडी-कल्याण रस्त्याचे काम हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात हे काम बंद होते. मात्र, काही दिवसापूर्वी या कामाला पुन्हा सुरुवात झाली असून, आता कामाने वेग पकडला आहे. रांजनोली नाका ते शिळफाटा असा हा सहा पदरी रस्ता असून, सध्या शिळफाटा ते देसाई गाव या अडीच किमीच्या टप्प्याचे आणि दुर्गाडी पूल ते पिंपळगाव या 2.2 किमीच्या पट्ट्याचे काम प्रगतीपथावर आहे.
सध्या शिळफाटा ते देसाई गाव या टप्प्यात रस्त्याच्या मध्यभागी पहिल्या मार्गिकेच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तिसऱ्या मार्गिकेपर्यंत काम होईल. तर पडले गाव ते शिळफाटा या २.३ किमी लांबीच्या चारही मार्गिकेचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान कामाच्या गुणवत्तेवर एमएसआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचा दावा ही एमएसआरडीसीने केला आहे. असा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कल्याणमधील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल असा ही दावा एमएसआरडीसीचा आहे.