मुंबई - सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन मुक्ती मोर्चाने आज भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला कुर्ल्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कुर्ला रेल्वे स्थानक पूर्व व पश्चिम परिसरात काही दुकाने बंद होती, तर काही चालू होती.
केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू झाला. या कायद्याला काही राज्यांसह संघटना आणि नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तर सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असलेले महिलांचे आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे.
त्यामुळे आज बहुजन मुक्ती मोर्चाकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा परिणाम मुस्लीमबहुल परिसरामध्ये दिसून आला. सकाळी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मध्य रेल्वे 10 मिनिटे उशिराने धावत आहे.
तर मंगळवारी राज्यातील व्यापारी वर्गाने कोणत्याही राजकीय बंदमध्ये दुकाने बंद करणार नाही, अशी काही पोलिस ठाण्यांमध्ये निवेदने दिली होती. त्यामुळे सकाळपासूनच चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी हजर आहेत. तसेच बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात जागो-जागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.