मुंबई- ठाण्यातून मुंबई मधील भांडुप येथे खासगी कामासाठी जाणाऱ्या व्यक्तीची बॅग रिक्षात राहिली होती. रिक्षा चालकाला शोधून व्यक्तीला बॅग मिळवून देण्याचे काम भांडुप पोलिसांच्या पथकाने केले आहे. भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र अहीर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
ठाण्यात राहणारे विशाल भोसले यांनी काल संध्याकाळच्या सुमारास मुंबईच्या भांडुप रेल्वे स्थानक परिसरातून उत्कर्षनगर येथे जाण्यासाठी रिक्षा घेतली होती. विशाल भोसले यांच्या बॅगेत कंपनीची कागदपत्रे आणि रोख साडेसहा लाखाचा ऐवज होता. अपेक्षित ठिकाणी उतरल्यानंतर भोसले यांना बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर भोसले यांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अहीर व पोलीस अमलदार आव्हाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरामार्फत शर्थीचे प्रयत्न करून रिक्षा चालकाला गाठले व त्याच्याकडील बॅग भोसले यांना परत केली. अहीर यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.
हेही वाचा- 'मेट्रो 4 चे कारशेडही कांजूरमार्गमध्ये केल्यास वाचतील 7 ते 8 हजार कोटी'