मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबा संदर्भात मुक्तफळे उधळली आहेत. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. औरंगजेबने सति प्रथा बंद केली होती असा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि अशोक वाजपेयी यांनी उपस्थिती लावली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. नेमाडे यांच्या वादग्रस्त विधानानंतर मराठा क्रांती मूक मोर्चा संघटना आक्रमक झाली आहे. नेमाडेंनी देशातील जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.
काय म्हणाले भालचंद्र नेमाडे: आपल्याला इतिहासासंदर्भात माहिती हवी असेल तर पुस्तक वाचणे गरजेचे आहे. मीदेखील अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यासंदर्भात माझे काही निरीक्षण मांडायचा प्रयत्न मी करत आहे. दुसऱ्या बाजीरावबाबत चुकीची माहिती सांगितली जाते. दुसरा बाजीराव चांगला होता. त्यांच्यावर मला नाटक लिहायचे होते. आपण जो इतिहास समजतो, तो खरा नाही. खऱ्या अर्थाने इतिहास लिहावा लागेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने दुसरा बाजीराव लिहायला पाहिजे. दुसरा बाजीराव मोठा माणूस होता. त्यांनी पेशव्यांच्या ताब्यातून महाराष्ट्राला वाचवले. इंग्रजापेक्षा पेशवे जास्त क्रूर होते.
काशीतील पडितांनी राण्या भ्रष्ट केल्या: नेमाडे म्हणाले, की औरंगजेबाच्या दोन राण्या काशीविश्वेश्वराला गेल्या होत्या. त्या परतल्या नाहीत. काशीतील पंडितांनी त्या दोन राण्या भ्रष्ट केल्यामुळेच तेथे औरंगजेबाने मोडतोड केली. तीच ज्ञानवापीची मोडतोड असल्याचा दावा नेमाडे यांनी केला आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलतानाही नेमाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुख्य सेनापती मुसलमान होता. तर औरंगजेबाचा मुख्य सेनापती हा हिंदू होता. अशा प्रकारचे एकापाठोपाठ दोन वादग्रस्त वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे. तसेच औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले.
औरंगजेबने सतीप्रथा बंद केली: औरंगजेब हा सतीप्रथा बंद करणारा पहिला राजा होता. सध्या दररोज बातम्या येत आहेत. तीनशे साडेतीनशे लहान मुली पळवून नेल्या जातात. हे सहन होत नाही. येथे राहायचे कशाला असा प्रश्न नेमाडे यांनी उपस्थित केला. तसेच मेंदूची क्षमता कमी होत असल्याकारणाने सरकारने स्मार्टफोन आणि इंग्रजी शाळांवर बंदी आणावी,असे आवाहनही नेमाडे यांनी सरकारला केले.
भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबचा इतिहास सांगितला तो नेमक्या कोणत्या पुस्तकातून सांगितला. कोणत्या पुस्तकातील निरीक्षण त्यांनी मांडले याविषयी सांगितले नाही. -शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील
औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा हेतू?: ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई येथील कार्यक्रमात ज्ञानव्यापी मशीद,पेशवाई आणि औरंगजेबाबाबत काही वक्तव्ये केली. त्यात प्रकर्षाने औरंगजेबाने प्रथम सती प्रथा बंद केली. हे त्यांचे वक्तव्य मान्य करण्यासारखे नाही. राजमाता जिजाऊ आपले पती शहाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत. त्यांना स्वराज्य उभारणीचे कर्तव्य महत्वाचे वाटले. अशीच उदाहरणे इतिहासात आणखी पाहायला मिळतील. मात्र अशा गोष्टींचे श्रेय कोणी औरंगजेब सारख्यांना देत असतील, तर ते साफ चुकीचे आहे. नेमाडे यांच्याकडे जर काही संशोधन असेल तर त्यांनी अर्धसत्य मांडण्यापेक्षा विस्ताराने समाजापुढे ते मांडले पाहिजे. मात्र आपण पाहतो महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा भालचंद्रजी नेमाडे असतील, हे आज औरंगजेबाबाबत जी वक्तव्ये करीत आहेत. त्यामागे औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा त्यांचा हेतू आहे की काय? आत्ताच अशी वक्तव्ये यांची का येत आहेत? याचाही शोध घेतला पाहिजे. संशोधन केले पाहिजे, असे मत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
नेमाडेंना काळ फासणार: मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या वादग्रस्त दाव्यावरून मराठी क्रांती मूक मोर्चा आक्रमक झाला आहे. तथाकथित ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. जनतेच्या जनभावना दुखावण्याचे काम त्यांनी केले आहे. जातीय तेड निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.औरंगजेबचे उदात्तीकरण करायचे असेल तर त्यांनी हा देश सोडून सर्व पाकिस्तानात जावे. नेमाडेंनी देशातील जनतेची माफी मागावी,अन्यथा नेमाडे यांना राज्यात कुठे फिरू देणार नाही, असा थेट इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिला.
हेही वाचा-