मुंबई - लाईफलाईन असलेल्या ‘बेस्ट'ची चाके पुन्हा एकदा थांबणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे. बेस्ट कामगारांचा प्रलंबित वेतनकरारासह विविध मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीने शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (बुधवार) या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत मागण्यांसंदर्भात ठोस काही विचार केला जात नाही. तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, असे मंगळवारी शशांक राव यांनी सांगितले आहे. त्यानुसारच आजही 98% कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत, ड्युटी बजावत काहींनी उपोषण केले आहे. सरकारने अंत पाहू नये अन्यथा पुढील निर्णयही कामगार घेतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा - युनियनच्या मागे लागून भविष्य धोक्यात टाकू नका, दिवाकर रावते यांच्या कर्मचाऱ्यांना कानपिचक्या
बेस्ट संपावरून मंगळवारी दिवसभर चर्चा, व्यूहरचनांच्या वेगवान हालचाली सुरू होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बेस्ट कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यात कामगारांच्या वेतनवाढीसह अन्य मागण्यांबाबत ठाकरे यांनी सकारात्मक दृष्टिकोन मांडल्याचे बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पण, फक्त सकारात्मकता दाखवणे हे योग्य नाही. त्यामुळे मागण्या मान्य करा तरच सुरू केलेला संप मागे घेऊ, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
हेही वाचा - बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार येत्या दोन ते दिवसात करू - अनिल परब
महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर बेस्ट कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिन करावा, तसेच महापालिका आणि बेस्ट कामगारांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत तफावत करू नये, या तीन प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कृती समितीने वडाळा डेपो येथे हे बेमुदत उपोषण सुरू आहे. बेस्ट वर्कस युनियनचे सरचिटणीस शशांक रावही या उपोषणात सहभागी झाले आहेत. मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये. वेळ आल्यास कामगार एकत्र येत पुढील निर्णयही घेतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे .