मुंबई - निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. मुंबईत राजकीय पक्षांनी प्रचारासाठी बेस्टच्या बसचाही वापर केला आहे. त्यामधून बेस्टची ४८ लाख रुपयांची कमाई झाली आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
निवडणुकीत बॅनर, पोस्टर, पत्रक, प्रचार फेऱ्या, सभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला गेला. बेस्टच्या बस मुंबईतसह बाहेरही अनेक ठिकाणी दिवसभर फिरत असल्याने या निवडणुकीत बेस्टच्या बसचाही प्रचारासाठी वापर करण्यात आला. शिवसेनेने १०० आणि काँग्रेसने २० बसवर जाहिराती लावल्या होत्या. बेस्ट बसवर जाहिरातींसाठी नेमलेल्या कंत्राटी एजन्सीच्या माध्यमातून या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. बेस्टच्या बसवरील जाहिरातींसाठी राजकीय पक्षांनी सुमारे ४८ लाख रुपये मोजल्याचे समजते. बेस्टच्या एका बसवरील जाहिरातीसाठी सुमारे ४० हजार रुपये इतका दर आहे. या जाहिरातींमुळे बेस्टच्या खजिन्यात सुमारे ४८ लाखांची भर पडली आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन तयार
बेस्ट आर्थिक संकटात आहे. मुंबई पालिकेने बेस्टला २१०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. यामुळे बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती थोडीफार सुधारली आहे. एसी बस, परवडणारे तिकीट दर आदींमुळे बेस्टविषयी मुंबईकरांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, बेस्टवर जाहिरात करण्यात आल्या आहेत.
परवानगीची गरज नाही
बेस्ट बसवर जाहिरातींसाठी पक्षांकडून अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील माध्यम प्राधिकरण सनियंत्रण समितीकडे परवानगी मागण्यात आली होती. तेव्हा एसटी, बेस्ट बस, व्हिडीओ व्हॅनवर जाहिरात करण्यासाठी परवानगीची गरज नसल्याचे काँग्रेस, शिवसेनेला कळवण्यात आले होते.