मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेस्टदिनी (७ ऑगस्ट) बेस्ट वर्कर्स युनियनने संपाची हाक दिली आहे. युनियनच्या मागण्यांबाबत चर्चा होत असल्याने तसेच बेस्टमध्ये भाडेतत्वावर बसेस दाखल झाल्या तरी कामगारांना कामावरून काढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तोडगा काढण्यासाठी बैठका सुरु असल्याने बेस्ट कामगारांनी संप करू नये, असे आवाहन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केले आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी ९ जानेवारीपासून ९ दिवसांचा ऐतिहासिक संप केला होता. न्यायालयाच्या मध्यस्थीने तो संप मिटला. त्यानंतर एक सदस्यीय समितीच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत व्यवस्थापनाने बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर वेळोवेळी चर्चा करणे भाग होते. पण, त्यात टाळाटाळ करण्यात आल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे.
याबाबत बोलताना जूनमध्ये बेस्ट व्यवस्थापन, युनियन आणि महापालिका प्रशासन यांच्यात सामंजस्य करार झाल्यानंतर पुढची ध्येय धोरणे ठरविण्यासाठी अवधी लागत असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
सामंजस्य करारानुसार पालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार बेस्टच्या तिकीट दरात मोठी कपात करण्यात आली. त्यामुळे बेस्टमधील १० लाख प्रवाशांची संख्या वाढली आहे. तसेच बेस्टकडे भाडेतत्वावर बस दाखल होत आहेत. पालिकेने बेस्टला अद्याप ३०० कोटी रुपये दिले आहेत. कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम परत करता यावी, म्हणून पालिका आयुक्त आणखी २०० कोटी रुपये देणार आहेत. यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती सुधारत आहे. बेस्ट कर्मचारी आणि युनियनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबाबत बैठका सुरु आहेत. बैठकांमधूनच मार्ग निघणार असल्याने कर्मचाऱ्यांनी संप करू नये. संप करून नागरिकांना आणि प्रवाशांना वेठीस धरू नये असे, आवाहन अनिल पाटणकर यांनी केले आहे.
संपाबाबत उद्या (मंगळवार) युनियनचा मेळावा
बेस्ट कामगारांच्या प्रलंबित वेतन करार व इतर मागण्यांबाबत आंदोलनाची रणनीती आणि निर्णय घेण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्यावतीने शिरोडकर हॉल येथे सायंकाळी ६ वाजता बेस्ट कामगारांचा मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यात संपाबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.