मुंबई - बेस्ट उपक्रमाचे भाडे कमी करण्याचा प्रस्ताव नुकताच बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाला गुरुवारी पालिका सभागृहाने एकमताने मंजुरी दिल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही दर कपात लागू होणार आहे. मुंबईकरांना स्वस्त दरात बेस्ट बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार असल्याने या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले आहे.
बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने सहाशे कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र शंभर कोटी रुपयांचा पहिला हफ्ता देताना पालिकेने काही अटी बेस्ट प्रशासनापुढे ठेवल्या. त्यानुसार भाडे करारावर ५३० बस घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बस भाड्यात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे मांडला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर बसभाडे कपातीचा प्रस्ताव एकमताने बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
वर्षाला १२५ कोटींचे नुकसान -
आज हा प्रस्ताव पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला, यावेळी विरोधी पक्ष नेते रावी राजा यांनी, बेस्ट ज्या बसेस घेणार आहेत, त्या ताफ्यात कधी येणार आहेत याची माहिती देण्याची मागणी केली. ५ रुपये भाडे केल्याने बेस्टचे दरवर्षी १२५ कोटी रुपयांचे नुकसान होणार असून हा तोटा वाढत जाणार आहे. यामुळे हे बेस्टचे होणारे नुकसान पालिकेने भरून काढावे. तसेच बेस्टला २ हजार कोटी रुपयांची गरज आहे ते ही पालिकेने द्यावेत अशी मागणी रवी राजा यांनी केली.
विकास प्रकल्पांना बेस्टने विज द्यावी -
राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पालिकेने इस्क्रो अकाऊंट उघडून बेस्टला मदत करावी अशी मागणी केली. भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी सीएनजी बसेसला आग लागून होणाऱ्या अपघाताचा मुद्दा उपस्थित करत यात सुधारणा करण्याची मागणी केली. रजनी केणी यांनी मुंबईत सुरु असलेल्या विकास कामांना वीज देऊन बेस्टने आपले उत्पन्न वाढवण्याचा सल्ला दिला. तर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शेअर रिक्षांच्या जागा पालिकेच्या असल्याने त्या ठिकाणी बसेस साठी जागा उपलब्ध करून रिंगरूट सेवा सुरू करावी, अशी सूचना केली.
नवीन दर (रुपये)
कि.मी सर्वसाधारण बस वातानुकूलित
५ ५ ६
१० १० १३
१५ १५ १९
१५ पेक्षा अधिक २० २५
दैनंदिन बस पास सर्वसाधारण बस गाड्यांसाठी ५० रुपये तर वातानुकूलित ६० रुपये करण्यात येणार आहे.