मुंबई - 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून (दि. 8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोरेगाव बस डेपोतून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.
सकाळी मोठ्या संख्येने मुंबईकर प्रवासी बेस्ट बसची प्रतीक्षा करत रांगेत गोरेगाव डेपोत उभे असलेले पाहायला मिळाले. मात्र, पहिल्याच दिवशी बेस्टच्या फेऱ्या उशीराने सुरू असल्याची तक्रार गोरेगाव बस डेपोत उभ्या असलेल्या प्रवाशांनी केली. उपनगरीय रेल्वे (लोकल रेल्वे) बंद असल्याने बेस्ट बसमुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, बेस्ट बस वेळेत न धावल्यास कामावर पोहचण्यास विलंब होईल, असे देखील प्रवाशांचे म्हणणे आहे.
बेस्ट प्रशासनाने प्रवाशांना सामाजिक अंतर राखून प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बसमधील डावी आणि उजवीकडे दोन जणांसाठी असलेल्या प्रत्येक आसनावर केवळ एकाच प्रवाशाला बसून प्रवास करता येणार आहे. तसेच फक्त 5 प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा - 'मिशन बिगीन अगेन'मुळे मुंबईत मरीन ड्राईव्हवर गर्दी 'अगेन'