मुंबई - आज सकाळपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या केईएम रुग्णालयात 500 पैकी 150 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना लस दिली, त्यापैकी कोणावरही दुष्परिणाम झाला नसल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. हेमंत देशमुख यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.
150 लोकांचे लसीकरण -
कोरोना विरोधात गेले दहा महिने आरोग्य कर्मचारी आणि मुंबईकर लढा देत आहेत. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला असताना लस आली आहे. आजपासून या लसीकरणाला सुरुवात देखील करण्यात आली. मुंबईच्या 9 केंद्रांवर ही आज लस दिली जात आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात बूथ 5 असून प्रत्येक बूथवर 100 प्रमाणे 500 जणांना ही लस दिली जाणार आहे. 500 पैकी दुपारपर्यंत 150 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
दुष्परिणाम नाही -
आज लसीकरणाला सुरुवात झाल्यावर डॉ. मिलिंद नाडकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. आतापर्यंत ज्यांना लस दिली त्या कोणावरही दुष्परिणाम झालेला नाही. लस घेणे हा प्रत्येकाचा ऐच्छिक अधिकार आहे. आज जे लोक आले नाही, ते उद्या आले तर त्यांना लस दिली जाईल, असेही डॉक्टर देशमुख यांनी सांगितले.
दोन दिवसात बूथ वाढवणार -
केईएम रुग्णालयात सध्या 5 बूथ आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी 5 बूथ वाढवले जातील. त्यानंतर केईएम रुग्णालयात 10 बूथ होऊन दिवसाला एक हजार लोकांना लस दिली जाईल, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या वडिलांचे निधन