मुंबई - मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक बेळगाव सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीमावासीय नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीतील नेतेही उपस्थित होते.
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात बेळगाव सीमेवरुन वाद होत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत ठाकरे यांनी सीमा प्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून सीमा लढ्यात प्रत्यक्षरीत्या योगदान दिलेले छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक महिन्याला आढावा घेण्याचे आदेश देखील दिले आहे. तसेच जेष्ठ विधी तज्ञ हरिष साळवे यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तयार करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. यासाठी तात्काळ वकिलांचीही बैठक घेतली जाणार आहे. दरम्यान, समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.