मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासकीय शिवजयंतीचा उत्सव दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. राज्यभरात हा उत्सव दोन धडाक्यात साजरा केला जातो. मात्र यंदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा उत्सव मुंबईत 346 ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने मुंबईकरांच्या भावनांना हात घालण्यासाठी भाजपच्या वतीने हा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईतील 227 महानगरपालिका वार्डांमध्ये 346 ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम विभागात 58 ठिकाणी, उत्तर पूर्व विभागात 50 ठिकाणी, उत्तर मध्य मुंबईत 63 ठिकाणी, उत्तर मुंबईत 69 ठिकाणी, दक्षिण मध्य मुंबई 44 ठिकाणी, दक्षिण मुंबईत 62 ठिकाणी शिव आरतीचा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.
शिवआरतीचा घोष करणार : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरती प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर परंपरा आणि उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार यापूर्वी दहीहंडी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले. त्या पाठोपाठ आता जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या शिवजयंतीला व्यापक स्वरूपात साजरी करून मराठी जणांना साद घालण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
आग्रा येथे होणार शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा किल्ल्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. मराठ्यांच्या इतिहासात आग्रा किल्ल्याला खूप मोठे स्थान आहे. याच किल्ल्यातील 'दिवाण-ए- आम' यामध्ये छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला बाणेदारपणे सामोरे गेले होते. त्यामुळे यंदा आग्रा किल्ल्यातही छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष होणार असल्याचे माहिती शेलार यांनी दिली. शिवजयंतीच्या या महोत्सवात विरोधकांनी सहभागी व्हावे असे, आवाहन करत वरळीच्या शिवजयंती महोत्सवात वरळीच्या पाहुण्यांनीही सहभागी व्हावे, असा टोला शेलार यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांना यावेळी लगावला. पुणे येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.