मुंबई - आमदारांसाठी निवासाची व्यवस्था असलेल्या आकाशवाणी आमदार निवासात मागील काही महिन्यांपासून ढेकणांनी धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे आमदार निवासातील खोल्यांमध्ये आमदारांचे राहणे कठीन झाले असल्याचे समोर आले आहे. याचा त्रास शिक्षक आमदार नागो गाणार यांना काल सहन करावा लागला. त्यांना संपूर्ण रात्र लादीवर झोपून काढावी लागली. ही माहिती त्यामुळे खुद्द 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
मंत्रालयाच्या शेजारी आकाशवाणीसमोर असलेले जुने आमदार निवास ६ मजल्यांचे असून एका मजल्यावर ३६, अशा सुमारे २२० खोल्या आहेत. यात शिक्षक आमदारांपासून सत्ताधारी आणि विरोधीपक्ष आमदारांना त्यांच्या निवासासाठी खोल्या देण्यात आल्या आहेत. यात पहिल्या मजल्यावर आमदार नागो गाणार यांना १३० क्रमांकाची खोली देण्यात आली. मात्र, मागील काही महिन्यांपासून या खोलीत ढेकुणांनी धुमाकुळ घातला आहे. तसेच पहिल्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू असल्याने खोलीच्या बाहेरही येऊन बसता येत नाही. त्यामुळे आमदार निवासात अनेकांना ढेकणांमुळे रात्र जागून काढावी लागत असल्याचे आमदारांच्या स्वीय सहायकांनी सांगितले.
आमदार गाणार म्हणाले, मी काल रात्री १३० क्रमांकाच्या खोलीत आल्यानंतर मला ढेकणांचा प्रचंड त्रास झाला. यामुळे मी संपूर्ण रात्र या खोलीत लादीवर काढली. याविरोधात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचेही गाणार यांनी सांगितले.
या आमदार निवासाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कार्यालयाला सायंकाळी ६ वाजताच टाळे लागले होते. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.