मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेले सलून आणि ब्युटीपार्लर अखेर सुरू करण्यात येत आहेत. मात्र, हे सुरू करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशसनकडून घेण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आवश्यक असलेल्या काही सुविधा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर, ब्युटी पार्लर, सलूनची सेवाही सुरू होणार आहेत. मात्र, सलून चालू झाल्यानंतर आता दाढी आणि केस कापण्यासाठी ऑनलाईन अपॉईटमेंट घ्यावी लागणार आहे. तुमची सर्व माहिती दिल्यानंतरच तुम्हाला सलूनमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांचे झालेले नुकसान आणि भविष्यात घ्यावी लागणारी खबरदारी लक्षात घेता ५० टक्के भाववाढ करण्याचा निर्णयदेखील असोसिएशनने घेतला असल्याचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी सांगितले आहे.
सलून व्यवसायात काम करणारे अनेक कारागीर हे उत्तर प्रदेश भागातील आहे. सध्या अनेक कामगार मुंबई सोडून गेले आहेत. यामुळे आता नवीन कारागीर कुठून आणायचे असा प्रश्न मालकांसमोर उभा राहिला आहे. भविष्यात दुकाने सुरू झाल्यानंतर पीपीई किट्सचा वापर, वापरल्या जाणाऱ्या सामानांचे निर्जंतुकीकरण करणे, इत्यादीसाठी लागणारा नवा खर्च सलून मालकांना उभा करावा लागणार आहे. हा विचार करूनच केस कापणे, दाढी करणे याशिवाय सलूनमध्ये होणाऱ्या विविध कामांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार केस कापण्यासाठी २०० रुपये, तर दाढीसाठी १०० रुपये आकारण्यात येतील. फेशिअल, मसाज आदी इतर सेवांसाठी ५० टक्के दरवाढ करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन महिने दुकान बंद आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना बराच तोटा सहन करावा लागला आहे. सरकारच्या परवानगीनंतर ज्यावेळी केसकर्तनालय सुरू करावे लागणार आहे, त्यावेळी आम्हाला अनेक नवीन नियम लागू करून व्यवसाय करावा लागणार आहे. नवीन सामग्री देखील आणावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही दरवाढीचा निर्णय घेतला आहे असे चव्हाण यांनी सांगितले.