मुंबई : यंदा जी-20 देशाचे अध्यक्ष पद भारताकडे ( Chairmanship of G20 countries to India ) आले आहे. या अनुषंगाने भारतामध्ये विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी एक बैठक मुंबईत होत असून त्यासाठी मुंबई शहर सज्ज झाले आहे. जी20 साठी मुंबई शहराला जी20 च्या नावे सुशोभित करण्यात आले ( Name of G20 embellished ) आहे.
जी 20 साठी मुंबई सज्ज : महाराष्ट्रात मुंबई इथे 13 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या जी-20 विकास कार्यगटाच्या बैठका आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी देशभरातील आणि जगभरातील प्रतिनिधी मुंबईत येणार आहेत. या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई शहरांमध्ये जी 20 च्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरण करण्यात आले आहे.
मुंबईत असे केले सुशोभीकरण : मुंबईमध्ये सर्वत्र मेट्रोचे काम सुरू आहे. आणि त्यासाठी मेट्रो कडून बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. या बॅरिकेटिंग वरती मेट्रोचे नाव दिसत होते. मात्र आता या ठिकाणी जी 20 आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्र रेखाटण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे गेटवे ऑफ इंडिया सुद्धा सुशोभित करण्यात आला आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे.
G20 राष्ट्रगट म्हणजे काय ? तर G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती. पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता. सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे. 2008 च्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख दरवर्षातून एकदा G20 लीडर्स समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले.
G20 अध्यक्षपद म्हणजे काय ? संयुक्त राष्ट्रांचे जसे न्यूयॉर्कमध्ये एक कार्यालय आहे, तसे G20 देशांचे कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही. अजेंडा आणि समन्वय साधण्याचे काम G20 देशांचे प्रतिनिधी करतात ज्यांना शेरपा म्हणून ओळखले जाते. दरवर्षी एका देशाकडे G20चे अध्यक्षपद येते. यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात. प्रत्येक प्रेसिडंसीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो. G20 चे विद्यमान अध्यक्ष आधीचे आणि पुढचे अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीने कारभार चालवातात.