मुंबई BCCI on Environmental Concerns : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरूवारी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या 33 व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका सामन्याच्या आधी मुंबईत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांची आतिशबाजी होणार नसल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे सचिव जय शाह यांनी सांगितलंय. जय शाह यांनी एका निवेदनात म्हटलंय की, भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था पर्यावरणाच्या चिंतेबद्दल संवेदनशील आहे. म्हणून त्यांनी हे प्रकरण आयसीसीकडे नेलं. त्यानंतर बीसीसीआयनं प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कोणतीही आतिशबाजी न करण्याचा निर्णय घेतलाय.
काय म्हणाले जय शाह : जय शाह म्हणाले की, बीसीसीआय पर्यावरणीय समस्या हाताळण्यासाठी कटिबद्ध आहोत. चाहते आणि भागधारकांचं हित नेहमी अग्रस्थानी ठेवणार आहोत. 'बीसीसीआय पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून मी हे प्रकरण आयसीसीकडे औपचारिकपणे मांडलंय. मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढू शकेल, अशी आतिशबाजी होणार नाही. पर्यावरणविषयक समस्या हाताळण्यासाठी बीसीसीआय कटिबद्ध आहे आणि त्याकडं नेहमीच लक्ष देणार आहोत.
लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य : बीसीसीआयनं मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केलीय. जय शाह म्हणाले, 'मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेबाबत बीसीसीआय चिंता करते. तसंच आम्ही क्रिकेटच्या उत्सवाप्रमाणं ICC विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचवेळी आमच्या सर्व लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर आम्ही ठाम असल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलंय.
भारताचा गुरुवारी श्रीलंकेसोबत सामना : भारताला आपला पुढचा सामना गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सहा सामने जिंकून भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत, तर गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत तळाशी आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेलाही उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी गुरुवारच्या सामन्यात विजय आवश्यक असेल.
हेही वाचा :