मुंबई : देशभरात आजपासून 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही, असे एसबीआयने स्पष्ट केले असले तरी सुद्धा काही बँकांमध्ये नोट बदलीसाठी फॉर्म भरून घेतला जातो आहे. या फॉर्मवर खातेधारकाचे नाव, त्याचे ओळखपत्र, त्याचबरोबर आधार कार्ड क्रमांक लिहिणे अत्यावश्यक आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिक याबाबत आता बँकांकडे विचारणा करत आहेत.
अनेकांना माघारी परतावे लागले : 2000 च्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. आजपासून ही मुदत सुरु झाली आहे. आज बॅंकांमध्ये काही जण इतरांचे पैसे जमा करण्यास आले होते. परंतु या बॅंकांनी नोट बदल्यासाठी त्यांच्याकडून ओळखपत्राचा फॉर्म भरण्याची मागणी केल्याने या ग्राहकांना बँकांतून माघारी परतावे लागले. स्टेट बॅंकेने या प्रकरणी स्पष्ट निर्देश दिले असतानाही काही बॅंका नोटा बदलण्यासाठी ग्राहकांकडून त्यांच्या ओळखपत्रांची मागणी करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी अनेकांनी बँकेकडे तक्रार केली आहे. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
रिजर्व बँकेच्या गव्हर्नरांचे गर्दी न करण्याचे आवाहन : मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांनी नोटा बदली करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली आहे. नोटा बदलीसाठी 4 महिन्यांचा अवधी असल्याने नागरिकांनी बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. मात्र तरीसुद्धा नागरिक या नोटा लवकरात लवकर बदली करून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत आहेत. सध्या एका वेळी 2000 च्या 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपये बदलण्याची परवानगी आहे.
हे ही वाचा :
- RBI Guidelines : आजपासून 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या काय आहेत आरबीआयचे मार्गदर्शक तत्त्वे
- 2000 Note Exchange : आजपासून 'नोटबदली' सुरू; फॉर्म भरून घेत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम
- EXCHANGE OF 2000 NOTE : दोन हजार रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू, ग्राहकांचा मात्र अत्यल्प प्रतिसाद