मुंबई - बालभारतीच्या पहिली ते दहावीच्या पुस्तकातील कवितांचा बच्चेकंपनीसाठी धमाल रंगमंचीय अविष्काराचा पहिला प्रयोग मुंबईत शिवाजी मंदिरात सादर झाला. बालरंगभूमीवर काम करणाऱ्या गंधार या संस्थेमार्फत हा अविष्कार सादर करण्यात आला.
बालभारतीच्या अनेक कविता आजही कानावर पडल्या तर आबालवृध्दांना शाळेतील बाकावर नेऊन बसवितात. अशा निवडक ३० हून अधिक कवितांचे विद्यार्थ्यांसमोर नाट्य, गायन, वाचन, नृत्य स्वरुपात सादरीकरण झाले तर त्यांना दप्तराचे ओझे वाटणारी पुस्तके हलकी वाटू लागतील आणि या नव्या मित्रांशी विद्यार्थ्यांची मैत्री जमेल. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमातून येणारा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे, असे कार्यक्रमाचे संकल्पक प्रशांत डिंगणकर म्हणाले. या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला शिवाजी मंदिर येथे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार, आमदार संजय केळकर, अशोक हांडे, अभिनेते विजय गोखले, नाटककार प्रदीप ढवळ यांच्या उपस्थित होते.
तर या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग २५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वा. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महापौर मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमासाठी एक लाखाची देणगी जाहीर केली.