मुंबई - राज्यात जनतेचे अनेक प्रश्न युती सरकारने सोडवले नाहीत. शेती, बाजार आणि इतर उद्योगधंदे सरकारच्या धोरणामुळे उध्वस्त झाले आहेत. राज्यात मंदीमुळे कारखानदारीही बंद होत आहे. त्यामुळे शहराकडे रोजगारासाठी गेलेले तरुण परत गावाकडे येत आहेत. सरकारच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर जनतेमध्ये असून राज्यातील जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज (शनिवारी) व्यक्त केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मागील पाच वर्षात काँग्रेसने सर्वसामान्य शेतकरी, गरीब जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलने केली. सरकारविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने कामे केली आहेत. लोकांच्या प्रश्नांवर काँग्रेस कायम रस्त्यावर उतरत असते. आज राज्यभरात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने तयार असून या विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून देतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी
युती सरकारच्याविरोधात जनतेमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न पूर्णपणे सोडवलेले नसून गरीब जनतेलाही वाऱ्यावर सोडले. नुकत्याच सांगली, कोल्हापुरात आलेल्या महापुराचे सरकारला नीट व्यवस्थापन करता आले नाही. त्यामुळे अशा आपयशी सरकारला पुन्हा सत्तेत जनता बसवणार नाही. यामुळे या निवडणुकीत राज्यातील जनता आम्हालाच पाठबळ देईल, असेही थोरात म्हणाले.
हेही वाचा - '220 प्लस जागा निवडून येतील; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात'