मुंबई - अखिल भारतीय काँग्रेसने आज राज्य विधीमंडळ गटनेते म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली. हॉटेल 'जे डब्ल्यू मॅरियट' येथे झालेल्या एका बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, काँग्रेसचे राज्य प्रभारी व वरिष्ठ नेते मल्लीकार्जुन खरगे यांनी ही निवड केली असल्याची घोषणा केली.
सर्वोच्च न्यायालयाने उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितल्यानंतर, काँग्रेसने आज आपल्या आमदारांची तातडीने बैठक बोलावून विधीमंडळ गटनेत्याच्या निवडीची घोषणा केली. गटनेते पदी बाळासाहेब थोरात यांचे नाव जाहीर होताच, काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
राज्यात काँग्रेसचा अपवाद वगळता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले गटनेते निवडले होते. मात्र, काँग्रेसकडून गटनेता निवडीसंदर्भात आतापर्यंत दिरंगाई करण्यात आली होती. यासाठी सर्वाधिकार हे राज्यातील आमदारांनी हायकमांडला दिले होते. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्यांची निवड होऊ शकली नव्हती. उद्या विधानमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होणार असल्याने काँग्रेसने आज आपला तातडीने निर्णय घेऊन बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे.