मुंबई - राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत आता राजकारण रंगत आहे. त्यांनी या पत्रातून राज्यघटना आणि मूलभूत तत्वाला हात घातला आहे. त्याची ही कृती, वक्तव्य आणि भाषा ही घटनेच्या विरोधात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.
मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातही तणावपूर्ण स्थिती आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते. त्यामुळे कोरोना आणि त्याचा धोका वाढू शकतो. सरकार म्हणून जनतेची जबाबदारी आमच्यावर आहे, त्यामुळे आम्ही काळजी घेत आहोत. दारूची दुकाने आणि बार सुरू केल्याचा आधार घेत भाजपा राजकारण करत आहे. राज्यपाल गोव्याचेही प्रभारी आहेत. तिथेही अशीच परिस्थिती आहे. मग त्यांनी गोव्यातील मंदिरे खुली करण्यासाठी पत्र का नाही दिले? राज्यपालांचे वागणे राष्ट्रपतींना मान्य आहे? असे प्रश्न थोरात यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. त्याचे कौतुक करायला हवे मात्र, राज्यपालांनी तसे केले नाही. राज्यपाल हे वडीलधारे आहेत. त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणार नाही, पण त्यांनी काळजी घ्यायला हवी होती, असे थोरात म्हणाले.