मुंबई - विधानसभेत सर्वात जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजपकडून आमच्या पक्षातील काही आमदारांना फोडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. यासाठीची माहिती मला आमदारांकडून मिळाली असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. सत्ता स्थापन करण्यासाठी हे लोक गोड बातमी देतोय, असे सांगत होते, ती बातमी काही येत नाही, पण गोड बातमी म्हणजे 'मॅटर्निटी होम' केले काय? असे महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला असल्याची टीकाही थोरात यांनी केली.
यावेळी थोरात म्हणाले की, भाजपचे लोक आमच्याकडे येत असल्याचा निरोप आमच्या काही आमदारांकडून आपल्याला मिळाला आहे. हे लोक साम-दाम-दंड-भेद या सगळ्या नीतीचा वापर करत आहेत, असेही आमदार मला सांगत आहेत. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात असे घडू नये, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या लोकांनी अशा गोष्टी केल्या. आमचे अनेक लोक फोडले आणि या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे असा प्रकार त्यांनी करू नये, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यातच सेना-भाजप हे विधानसभा निवडणूक एकत्र लढले होते. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करावी, अशी अपेक्षा असल्याचे थोरात म्हणाले.
हेही वाचा - शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत
भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांची भेट घेतली. परंतु, सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. यावर विचारले असताना थोरात म्हणाले की, आज खरे तर सत्ता स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे आम्हाला असे वाटत होते की, हे लोक गोड बातमी, गोड बातमी असे जे बोलत होते, ती आज आम्हाला बातमी कळेल. परंतु, ही बातमी अद्याप काय आली नाही.
हेही वाचा - मी पुन्हा येईन...'गप्प बसा', शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी
राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजप करत नाही. परंतु, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण करू नये आणि त्यासाठी जबाबदारी ही भाजपची आहे. मित्रपक्ष आपल्यासोबत का येत नाही? त्याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत आणि ती शोधून त्यांनी सत्ता स्थापन केली पाहिजे. कारण, आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, असेही थोरात म्हणाले.