मुंबई - सावरकर यांनी 1911 च्या आधी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादाची भूमिका घेतली होती. त्या सावरकरांना आम्ही अभिवादन केले आहे, असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
एकीकडे काँग्रेसने वारंवार सावरकर विरोधी भूमिका घेतली असताना बाळासाहेब थोरात यांनी सावरकर यांना अभिवादन केल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. काही काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या 'शिदोरी' या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात मजकूर छापून आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निम्मित सावरकर गौरव प्रस्ताव विधानसभेत घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपने लावून धरली होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांची मागणी फेटाळत कामकाजाला सुरुवात केली. यानंतर सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावेळी विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी हे वक्तव्य केले.
सावरकर यांच्या प्रतिमेला काँग्रेस नेत्यांनी अभिवादन केले नाही. हे वक्तव्य चुकीचे आहे . मी स्वत: त्यांना अभिवादन केले. मात्र, हे अभिवादन त्यांनी सन 1911 पूर्वी केलेल्या कार्याकरीता केले आहे, असे थोरात यांनी सांगितले. सन 1911 नंतरचे सावरकर यांचे कार्य वादातील आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला आपल मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शिदोरी मासिकामध्ये सावरकर यांच्याबाबत मत व्यक्त केले आहे. या लिखानावर ज्यांना आक्षेप आहे, ते अक्षेप घेवु शकतात. मात्र, सावरकर यांच्याबाबत शिदोरी या मुखपत्रात पुन्हा विरोधकांना उत्तर दिले जाईल, असेही थोरात यांनी सांगितले.