मुंबई - मागील ५ वर्षात भाजपसोबत सत्तेत राहून शिवसेनेनं खूप काही सहन केले आहे. आता अजून किती सहन करते हे आता आम्हाला पाहायचे आहे. अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर केली.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीपूर्वी थोरात यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर टीका केली. गेल्या ५ वर्षातील सेना-भाजपची युती सत्तेत कधीही मनापासून नव्हती. आताही हे स्पष्ट झालेले आहे. युतीत सर्वात जास्त शिवसेनेला सहन करावे लागले आहे. त्यामुळे त्याने या वेळी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन थोरात यांनी केले.
भाजपने आज आपला विधिमंडळ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा निवड करून फडणवीस मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, की मुख्यमंत्रीपदावरून यावेळी भाजप सेनेमधील मतभेद हे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यात यांची युती होणार की नाही, यावर आपल्याला काहीही माहीत नाही. मात्र, आतापर्यंत सहन केलेल्या सेनेने काय करायचे ते ठरवले पाहिजे, असेही थोरात म्हणाले.
आज होत असलेल्या बैठकीबद्दल थोरात यांनी सांगितले की,अवकाळी पावसाने राज्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यावर काय करता येईल यासाठी आजच्या बैठकीत चर्चा करणार आहोत. राज्यात इतर निवडणुका या वर्षात होणार असल्याने या निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असेल यावरही आम्ही चर्चा करणार आहोत. आमच्या आमदारांची उद्या बैठक होणार असून विधानमंडळ नेत्यांसाठी लवकरच बैठक होईल.
परतीचा आणि अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तातडीने आम्हाला काय करता येईल हा आमच्या आजच्या बैठकीत प्रमुख अजेंडा आहे. या बैठकीनंतर राज्यात समिती स्थापन करून त्यासाठी काय कार्यवाही करता येईल यासाठी चर्चा होणार आहे, अशी माहितीही थोरात यांनी यावेळी दिली. या बैठकीला काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार नाना पटोले, आमदार अमित देशमुख काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह हुसेन दलवाई आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.