मुंबई - उत्तरप्रदेशात जे हत्याकांड झाले, त्यातून ते कुटुंब निराधार झाले, अशा ठिकाणी त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्याकडे जाणे आवश्यक असते. ती जबाबदारी असते. तीच जबाबदारी पार पाडत असताना आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना तिथे जाऊ दिले नाही, ही अत्यंत निषेधार्ह, दुर्दैवी आणि लोकशाहीला घातक असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. उत्तरप्रदेश सरकारने एक प्रकारे विघातक कृत्य केले आहे, आम्ही याचा निषेध आज रस्त्यावर उतरून केला असल्याचे थोरात म्हणाले.
उत्तरप्रदेशात ज्यांच्या कुटुंबातील लोकांचे हत्या करण्यात आले, त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांचे सांत्वन करणे, त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी जात असताना प्रियांका गांधी यांना रोखण्याचा उत्तरप्रदेश सरकारकडे कोणता कायदा होता, असा सवाल थोरात यांनी करत जोरदार निषेध व्यक्त केला.
प्रियांका गांधी यांना रोखणे हे अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीला घातक आहे. उत्तरप्रदेश सरकारने एक प्रकारे विघातक कृत्य केले आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो. पुढच्या कालखंडात या देशात लोकशाही शिल्लक राहणार की नाही, अशी परिस्थिती या देशात निर्माण केली जात असताना देशातील आणि राज्यातील संपूर्ण जनता आमच्याबरोबर आहे. त्यामुळेच आज प्रियांका गांधी यांच्या अटकेची बातमी कळताच आम्ही आज रस्त्यावर उतरून हे निषेध आंदोलन केले.
भाजपचे राजकारण हे देशात आणि राज्यात कोणत्या दिशेने जात आहे, हे आजच्या या घटनेवरून दिसून येते. ते हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे. हे लोक राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे काम करत आहेत. भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत, ते नागरिकांना मिळाले पाहिजेत. ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्या कुटुंबाला भेटायला गेले पाहिजे, परंतु उत्तरप्रदेशच्या सरकारने प्रियांका गांधी यांना त्या कुटुंबाला भेटू न देता त्यांना अटक केली, आम्ही त्याचा निषेध करतो असेही थोरात म्हणाले.