मुंबई - देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्याग, संयम आणि विश्वशांतीचा संदेश देणारा हा सण मुंबईमध्ये उत्साहात साजरा होत आहे. मुस्लिम बांधवांनी शहरातील मुख्य ईदगाहसह विविध मशिदींमध्ये ईदची विशेष नमाज अदा करण्यात येत आहे. ईदच्या नमाजानंतर, मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
आजच्या दिवशी मुस्लीम बांधव बोकडाचे बळी देऊन आणि मोठी दावत ठेऊन हा कुर्बाणी सण जल्लोषात साजरा करतात. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता यंदाच्या कुर्बाणीत काटकसर करून या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा नेक निर्णय मुंबईतल्या अनेक मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
आज ईद निमित्त वांद्रे, डोंगरी, माहीम येथील मुख्य मशिदीसमोर विशेष नमाजासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी मौलाना यांनी उपस्थितांना बकरी ईदचे महत्व सांगितले. याशिवाय नमाजापूर्वी ईदसाठी आलेल्या जनसमुदायासमोर काही ठराव मांडले. यामध्ये दहशतवादाचे प्रतीक बनलेल्या संघटनेवर कायमची बंदी आणावी, महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावे, राजकीय भेदभाव करण्यापेक्षा समाजाच्या विकासासाठी योग्य काम करावे, असा ठराव ईदच्या नमाजापूर्वी मुस्लिम बांधवाकडून करण्यात आला.