मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनासाठी अनेक रुग्णालये सर्वसामान्यांसाठी सज्ज झाली असताना जनावरांसाठी असणारे मोठे बैलघोडा रुग्णालय मात्र बंद आहे. डॉक्टर नसल्याच्या कारणावरून ओपीडी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे अनेक पाळीव प्राण्यांच्या मालकांना प्राण्यांवर उपचार न करताच परत जावे लागत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी…
परळ येथे असणार्या या रुग्णालयाची ओपीडी बंद ठेवण्यात आली आहे. काही खासगी डॉक्टरांचे दूरध्वनी क्रमांक रुग्णालयाबाहेर लावण्यात आले आहेत. यांच्याकडून उपचार घ्या, असे सांगण्यात येत आहे. यामुळे जे मालक पाळीव प्राण्यांवर उपचार घेण्यासाठी या रुग्णालयात येत आहेत, त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे.
रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा रक्षक आणि प्राणी घेऊन येणाऱ्या लोकांमध्ये वाद देखील होत आहेत. डॉक्टर नसल्यामुळे ओपीडी बंद असल्याचे या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. तसेच आधीपासून उपचारासाठी दाखल असलेल्या प्राण्यांना देखील सोडण्यात येत आहे.